Friday, September 18, 2015

Her Full Story......तिची गोष्ट ..!


This is the real life story of "S", who has featured often on this blog over the years.
कुसुमची गोष्ट

हरगुडे

पुरंदर तालुका,  जिल्हा  पुणे .  त्यातलं  लहानसं हरगुडे खेडं  .  आज तिथे ग्रामपंचायत आहे, आणि ग्रामपंचायतीत ७ पैकी ३ मेंबर शिकलेल्या बायका अहेत.  २०११ चा सेन्सस प्रमाणे ह्या खेड्यात पुरुष व बायकांचे प्रमाण बऱ्यापैकी समान आहे , पण लहान मुलांमध्ये मुलं  ज्यास्त आणि मुली कमी , अस दिसतं.  वर्ष भर काम असणारी माणसं ५७१, व त्यातली  ३१५ शेती करणारी (मालक, भागीदार) आणि १२० शेतमजुरी करणारी .  

आज ह्या गावात अनेक योजना राब्तायत . वृद्धांसाठी श्रावण बाळ योजना , निराधार भूमीहीन शेतमजूर अनुदान योजना, पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम विकास योजना, पाळ्णाघरे, डे-केर, अंगणवाड्या , शाळांसाठी क्रीडांगणे व इतर सोयी करणारी यशवंत ग्राम समृध्द योजना, आणि इतर बरच काही. 


हे आजचे चित्र … 

तेव्हाची गोष्ट …

पन्नास पंचावन्न वर्षापूर्वी , अश्याच  एका रखरखीत, उन्हाळ्यातल्या,  कोरड्या,  देशावरच्या सकाळी ,  आपल्या वडिलांच्या शेतावरती, लहानगी कुसुम , लवकर उठून, शेण गोळा करायला जाई .  ती घरातली नंबर  दोनची मोठी , तिला एक मोठा  भाऊ होता.  पाठची एक बहीण आणि मग दोन भाऊ .  

पण शेणाची गाठ तिच्याशीच पडायची. 

रोज पाट्या पाट्या शेण गोळा करून आणायचं आणि शेतावरच्या एका मोठ्या खड्यात जमा करायचं. दिवसामागून दिवस जायचे आणि तिथे खत तयार व्हायचं.  जरा कुठे शेणाच काम झालं , कि घरात  पाणी भरायला ओढ्यावरती चकरा सुरु. मध्ये मध्ये लहान भावंडांवर डाफ़र्णे,  त्यांना शाळेची गडबड करणे, आणि कधी कधी त्यांना पुढे घालून शाळेत पोचवणे. 

तशी ती शेतात पण मदत करायची. आणि गुरं हकायची .  

शेजारयान साठी अथवा कोणासाठी,  एक म्हैस महिनाभर हाकली,  कि महिन्याचे पाच रुपये मिळायचे , ते ती घरी आईकडे द्यायची. गाय हाकली तर महिन्याचे दोन रुपये , आणि ते सुधा आईकडे द्यायची. कुठेतरी जत्रेत उण्डारत जा आणि बांगड्या विकत घे अशी पद्धत न्हवती , न्हवे , तिला माहित पण न्हव्त … 

तस शाळेचं आणि तिचं  वाकडच . वडीलांनी एकदा शाळेत धाडलं तिला . जाउन बसली पाटी  पेन्सिल घेउन पुढे . जशी जशी मुलं जमली, व पुढे बसू लागली , तशी ती मागे  मागे सरकत गेली . पाटी पुढेच राहिली, आणि ती मागच्या मागे वर्गातून पळून गेली . आणि मग पुन्हा शाळेत गेलीच नाही . 

जून मध्ये पावसाचे आगमन व्हायचे त्या आधी त्यांच्या शेतावर बैलगाड्यांची रांग लागायची. मोठ्या खड्ड्यातले शेणखत , एक बैलगाडी-भरून १५ रु ला विकलं जायचं, आणि तिच्या आईच्या पदरी थोडे पैसे शिल्लक पडायचे.  

तशी दूर दूरच्या शेतातून गुरे चारणे,  शेण गोळा करून, स्वतःच्या नावाच्या त्या शेतातल्या खड्ड्यात गोळा करणे आणि वर्षा अखेरीस खतमाती विकणे , हा त्या वेळचा, मुलींचा  पॉप्युलर धंदा होता, आणि हे पैसे त्या आपल्या आईकडे जमा करत. एकेका शेतात मुली आपापले शेणाचे खड्डे सम्भाळाय्च्या, आणि भरत राहायच्या. माणसा माणसात विश्वास असायचा , आणि एक दुसऱ्या च्या खड्यात कोणी लुडबुड करत नसे. 

तिला अजून आठवते, ती  शेजारयानशी वडीलांनी ठेवलेले उत्कृष्ट सम्बन्ध. एकदा शेजारयान च्या शेतात तिने सहा बैलगाड्या भरतील एवढे शेण  जमा केले.  तो मालक ते सर्व विकत घ्यायला निघाला आणि त्यांनी नव्वद रुपये देउ केले .  तिचे वडील म्हणाले, पैसे नको, पण तुझ्या लिंबाच्या झाडाचे लांब खोड आहेत, तसे तीन दे .  त्याच्याकडे शेताच्या बांधावर कितीतरी लिंबाची झाडे होती . त्यांनी खोडे दिली, आणि तिच्या वडिलांनी  आपल्या घरात जरूर असलेल्या दुरुस्त्या त्या लाकडांनी केल्या. आत्ता आत्ता  पर्यंत ते घर तसेच शाबूत होते…. 

तिची भावंड शिकली . आजच्या भाषेत , प्रगती झाली .  

पण तिला चौदावं  लागल आणि अवगतीच झाली असा म्हणाव लागेल. 

लग्न. 

कुठूनतरी नात्यातून प्रस्ताव आला, आणि तिच लग्न झाल.  दापोडीला पुण्याजवळ  सरकारी बंधारे विभागात काम करणारा माणूस. त्याला आईने दिलेलं  नाव देवाचे ,  पण कुसुमला  कधी स्वर्गसुख  दिसलेच  नाही . 

दारूचे व्यसन,  जबाबदारीची शून्य जाणीव , आणि तो तिला घेउन आपल्या भावाकडे राहू लागला .  तिला दिवस राहिले , आणि पाचव्या महिन्यात नवरा म्हणाला, आतापासूनच  माहेरी जा. ती गेली, आणि तिला एक छान  मुलगी झाली. आजी आजोबांच्या कौतुकात, नातीचे  सर्व नीटच झाले, पण बाळणतिणीचेही   सगळं व्यवस्थित झालं;  कदाचित शेवट्चच …

दीर-जाउ  तिच्याशी अतिशय चांगलं  वागत, पण सतत झिंगलेल्याशी  कसं जमवायचं अस कोणीतरी म्हटल्यावर,  ती व नवरा तिच्या  नणदेकडे राहायला गेले .  सगळीकडे जमेना, दारू चालूच, लोकं  बोलायची,  नवरा चिडायचा  आणि एके दिवशी मध्यरात्री त्यानं तेही घर सोडायचं ठरवलं .  बस. जायचं म्हणजे जायचं . ती रात्र , तिने तिच्या काही महिन्याच्या लहान मुली बरोबर , खडकी बझारच्या फुटपाथ वर काढ्ली .  

 आता येरव्ड्याजवळ , अत्यंत गचाळ भागात आपल्या चुलत भावाकडे तिला नवरा घेउन गेला .  हा कामावर गेला आणि हि कुठेही बाहेर गेली,  कि तिला लोक हट्कायचे , काय काय अर्वाच्च्य  बोलायचे. ती गुडघ्यापर्यंत दोन वेण्या घालायची .  मवाली पुरुष छेड  काढायचे . 

सगळ सहन करण्यापलिकडे  होतं  , आणि लवकरच हे जोडपं  , एका  लहानश्या झोपडीत राहायला  गेलं ; चाळीस  रु ठेव आणि वीस रु भाडं.  अधून मधून सासू राहायला यायची , तिलाही तिचा स्वतःचा मुलगा अधाताधा ओरडायचा.  एकदा  हिच्या पोटात असह्य दुखू लागल , ओटीपोटी खूप कडक झालं  आणि दुखलं , नवरा गुल, आणि हिच्याकडे मुन्सिपालटीच्या हॉस्पिटल साठी चार आणे  सुधा न्हवते .  

मुलीला बरोबर घेतलं , चुलत भावाकडून चार आणे घेतले , रांगेत बसून औषध आणलं  , आणि घरी येउन घेतलं .  त्यानंतर तीन दिवस तिच्या अंगावर मोठा पूर आल्यासारखं , प्रचंड गेलं , पावलं  बुडतील एव्हडा जास्त रक्तस्त्राव झाला , आणि ती निपचित पडली .  घरभर राडा , घाबरलेली छोटी मुलगी, आणि दारू पियुन कुठेतरी  पडलेला नवरा . शेजारच्या बायका धाउन आल्या, मुलीला जेवायला घातलं , हिचं  घर साफ करून, तिला काहीबाही खायला प्यायला घातलं , आणि हळू हळू ती बरी झाली, तशी नवरा तिला माहेरी  सोडून आला .  काही महिन्यांनी पुन्हा परत. 

संसार

तीन दगडाची चूल , गोळा केलेला लाकूड पाचोळा , पत्र्यावर थापलेली भाकरी , आणि तिचा झोपडपट्टीतला संसार सुरु झाला .  पुन्हा दिवस राहिले . नवरा नोकरीत पर्मननट झाला , आणि त्याचं दारू पिणं आणखीनच वाढलं.  घरात पैसे देत न्हव्ताच, आणि प्रचंड मारपी करायचा.  तिची आई बाळन्त्पण करायला आली , आणि मुलगा झाला .  

जवळपास एका म्हाताऱ्या मारवाडी माणसाचं  दुकान होतं. तो आणि त्याची म्हातारी बायको हिच्याकडे बघायचे  आणि त्यांना जमेल तशी मदत करायचे  .  तिला ज्वारी निवडायला द्यायचे, आणि दहा किलो ज्वारी निवडली कि चार आणे मिळायचे. असे पैसे मिळाले कि ती कन्वटीला बांधायची आणि मुलांसाठी काहीतरी खायला आणायची .  मग एकदा त्या मारवाड्याच्या ओळखीनी  एक दहा * दहा   चा , कुणा एका ओळखीच्या माणसाच्या मालकीच्या एका गोदामात्ला कोपरा राहायला मिळाला . त्याला पडले १५०० रुपये.  तिच्याकडे  कामे करून ९०० जमलेले. ती नवर्याला म्हणाली हे द्या, आणि बाकीचे ६०० काही महिन्यात कसे पण देउ .  त्या नराधामाने २०० रुपये दारूवर उधळले , आणि घरासाठी ७००च दिले . 

घराला चार भिंती, पण वरती डोक्यावर  काहीच नाही अशी परिस्थिती होती . समोरच्या बाजूला एका घराची दुरुस्ती चालू होती आणि कौलं उतरवत होते .  हिला तिसर्या वेळा दिवस गेलेले . अनेक महिने  तिने समोरच्या घरातून , विचारून, त्यांची कौलं गोळा केली, आणि उचलून उचलून घरी आणली.  कोणीतरी मुरूम आणून दिला , त्यानी  जमीन केली, आणि ज्या महिन्यात ७ तारखेस छप्पर झाले त्या महिन्यात १४ तारखेला तिसरा मुलगा झाला . पुन्हा तिची आई आली, जमेल तस तिला राखेवर झोपवून शेक दिला, बाळंतपण केल,  आणि गेली .  नवर्याचं मागील अंकावरून पुढे चालूच …

आत्तपर्यन्त्चा विक्षिप्तपणा काहीच नाही,  असं  नवरा वागू लागला . तिला रात्री घराबाहेर काढायचा, आणि मुलं  घाबरून पत्र्याच्या भोकातून आईला बघायची . हा आतमध्ये पड्लेला.  दिवसा मुलं आणि ही  बाहेर असली, कि कुलूप लाउन निघून जायचा. एकदा अशीच मुले आणि ही वाट बघत कितीतरी तास उभी होती , आणि शेवटी तिने  थोडासा पत्र वाकवून ,  प्रयत्न केला उघडाय्चा .  एव्ह्ड्यात  नवरा आला आणि त्यांनी कुलपाची किल्ली त्या भोकातून आत टाकली आणि निघून गेल. ती व मुलं बाहेर तशीच उभी . शेवटी कसबसं  सर्वात छोट्याला भगदाडातून सांभाळून आत सोडला , आणि तो किल्ली घेउन बाहेर आला, तेव्हा मायलेकं  आत घरी जाउ शकली.  

तिच्या हाताला उत्कृष्ट चव होती, अजूनही आहे. कधी भूक लागली म्हणून नवऱ्याला ताजी भाकरी,  वर तिखट आवडीची चटणी वाटून दिली, कि तो हसून तिच्या तोंडावर  ती  भाकरीसकट फेकायचा .   हेच तिचं  आयुष्य आणि हेच मुलांचं बालपण . एकदा रागवून आपल्या बहिणीकडे निघून गेला, आणि एक पहार घेउन घर पडायला आला.  मुलं शाळेत, हि कोणाच्या तरी घरी कामाला , आणि शेजारचे सांगत आले. तशी ही घरी धावली. 

हे तिच्या संसाराचे दिवस . ह्या तिच्या आठवणी . 

सासर 

ह्याच दिवसात सासू पुण्यात ससूनला  अड्मिट झालि. हिच्या नावानी विचारू लागली. इतक्या सगळ्या वर्षात , तिचे सासरच्या लोकांशी उत्कृष्ट संबंध होते .  सासू म्हणाली "हीच माझा सगळं  शेवटी करू दे " .  ती  ससूनला जायला निघाली, तर नवरा दारू पियुन आडवा, आणि म्हणाला, "गेलीस तर तंगड तोडीन " .  तरी ती गेली ,  आणि सासूला शेवटची भेट्ली .  दुसऱ्या  दिवशी सासू गेली , आणि सर्व माणसं तिथून गुल.   घरात अन्त्क्रीयेला पैसे नाहीत, नवऱ्याला आई गेल्याची फिकीर नाही , आणि हिने स्वतःच्या कुड्या शेजारणीकडे  गहाण  ठेउन पैसे घेतले आणि सर्व सामग्री इत्यादी आणून, सासूचा अंत्यविधी केला . नवरा नावापुरता लोकाना दाखवायला  आला .

शेवटी शेजाऱ्यानी तिच्या घरी तार करून , मुंबईहून भावांना बोलवून घेतलं  . एव्हांना दोन्ही लहान भाऊ कॉलेज शिकून कामाला लागले होते, आणि बहीण १० वी  करून , लग्न करून, नोकरीला होती . सर्व मुंबईला . तिचे भाऊ आणि वडील येउन तिला  चारही  मुलानसकट परत घेउन आले. आजच्या जगात सुधा हे फार कमी बघायला मिळतं.  

"मला खूप वेळा जीव  द्यावासा वाटायचा . एकदा येरवड्याच्या तिथल्या नदीवर पण गेले होते .  पण रात्रीच्यावेळी "हि कोण बाई नदीवर कश्यासाठी आली…"  असं  म्हणत दोन लोकं आली, आणि विचारपूस करून मला  घरी परत घेउन आली .  आणि मग मला वाटायचं , कि मी गेले, तर हा नराधाम मुलांना विचारणार नाही, आणि माझी मुल चार दिशांना वेगळी जातील , आणि त्याचं कोणीच रहाणार नाही "   असा आज ती ते दिवस आठवताना मला सांगते … 

मुंबई 

ती मुबईला आली, आणि माणसांच्या गर्दीत माहेरी राहू लागली .  चार घरची कामं धरली , समोर केंद्रीय विद्यालय होत, तिथे मुलाना घातलं , आणि थेंबे थेंबे पैसे  साठवून काही वर्षांनी भाड्याची  स्वतःची खोली घेतली. भावांनी तिचा नवरा जिथे नोकरीला होता,  तिथे संपर्क केला आणि त्याच्या अर्ध्या पगारावर तिचा हक्क सांगितला.  महिना अखेरीस   पगाराच्या दिवशी,  सर्व भाऊ व ती स्वतः तिथे पोचले .  शेवट पर्यंत नवऱ्याने पगाराच्या मस्टर  वर सही न करून पगार हातात घेतला नाही , कारण लगेच अर्धा तिला द्यावा लागला असता .   नवऱ्या वर पोटगी साठी केस केली, तर नवऱ्यानी आपलं नावच  बदललं आणि काहीच उत्तर दिले नाही . आज तिच्या मुलाना जातीचा दाखला हवा असतो, तेव्हा वडिलांचा नावाचा दाखला नाही, आणि वडिलांचे आणि मुलांचे नाव वेगळे , म्हणून तो मिळत नाही .

कुसुमची मुल शिकली, मुलगीही शिकली . हळु हळु नोकरीला लागली .  आजूबाजूला सगळीकडे कोम्प्यूटरचा वापर सुरु झाला आणि तिच्या मुलांनीसुधा ते सरावाने शिकून घेतलं .   मुलगी लग्नाला आली, आणि  तिचं, बघून वगैरे ,  कल्याणच्या एका मुलाशी लग्न ठरलं .  भाऊ सरसावले. त्यांचे काका जवळच्या कॉलेज  मध्ये नोकरीत कायम झाले  होते , त्यांच्या मुळे  तिथली  जागा मिळाली . रिसेप्शन केले. सर्वांनी मिळून आपल्या बहिणीचे लग्न हौसेने केले आणि ती सासरी गेलॆ.  मुलीच्या वडिलाना रीत म्हणून बोलावणे गेले . कसेही वागले तरी मुलीचे वडील आहेत, ते लग्नात हवे , असे म्हणून मुलं  त्यांना , नाखुशीने का होईना , रीतसर बोलावणे करायला गेली . 

लवकरच इतिहास  पुन्हा तसाच घडला .  तिचा जावई  खोटारडा निघाला. त्याला नोकरी न्हव्तीच . बायकोला मारणे, आणि तिच्याकडून पैसे घेणे हा उद्योग. आई वडिलांचही  ऐके ना . मुलगी एके दिवशी तिथून निघाली आणि माहेरी येउन पोचली .  मग सासरचे सगळे आले. चर्चा झाल्या . मुलीकड्च्याना वाटलं , जाउदे ,  पुन्हा जोडलं गेलं  सगळं , तर चांगलच आहे, दोघही वयाने लहान आहेत , सुरवातीचे दिवस आहेत , ई . ई.   मुलगी पुन्हा सासरी गेली . सुरवातीला जरा बरं होतं सर्व , आणि मग एके दिवशी त्यांनी तिला घरून दूर नेलं , मार मार मारलं , आणि तिला कुठल्यातरी बाझार भागात तसेच सोडून तो घरी चालता झाला .  ती निपचित पडलेली, आणि तिथल्या भाजीवाल्या बायकानी तिला उठवलं  , घरी नेलं , औषध पाणी केलं ,  मलम लावलं , तिला जेउ घातलं , झोपायला दिलं आणि दुसऱ्या दिवशी माहेरी आणून सोडलं .  निर्लज्ज नवरा पुन्हा आला . त्याला तिच्या भावांनी  उठवलं , आणि बाहेरचं दार दाखवलं , आणि बहिणी पासून दूर राहण्याची सक्त ताकीद दिली . काळाच्या ओघात तिची काडीमोड झाली , आणि ती अनेक नोकरयानचा अनुभव घेउन , आता मुलींच्या वसतिगृहात नोकरीला आहे. 

तिचे कुटुंब

आज सगळी मुलं  मिळवती अहेत.  मुलगीही मिळवती अहे.  एका मुलाची फटफटी आहे. तीन सुना आहेत . अनेक नातवंड आहेत .  एक सून १२ वी  झाली आहे, तिला कुसुमने लायब्ररीचा कोर्स शिकायला पाठवलं , आणि त्या नंतर तिने MH-CET  चा सर्टिफ़िकेट कोर्स ही पूर्ण केला.  ह्याचा कुसुमला खूपच अभिमान आणि  कौतुक आहे.  

कुसुमचं  बारीक लक्ष असत . तिला स्वतःला कोम्प्युटर वापरता येत नाही , कारण लिहिता वाचता येत नाही, पण तो काय करू शकतो ह्याची तिला कल्पना अहे.  सुनेला दिवस असताना एक ग्रहण आले, आणि वेगळी वेगळी लोक वेगळं वेगळं सांगू लागली . तिनी मला रात्री फोन  केला, आणि कोम्प्युटर वरून शोधायला सांगितले कि हे ग्रहण कुठून दिसणार आहे, त्याच्या  वेळा ई. ई.  तिला गूगल माहित्ये .  तिचा बँकेत अकाउण्ट अहे. त्यावर दुसरं  नाव मुलीचं घातलं  आहे. काही प्रश्ण असले कि यॆउन विचारते, आणि मगच काय करायचं ते ठरवते 

तिचे , ती राहते तिथे बायकांचे मंडळ आहे.  त्यांचे कार्यक्रम असतात , माहितीपूर्वक भाषणे असतात माहितगार लोकांची . ती स्वतः लिहित नाही, वाचू शकत नाही, पण ती त्यांच्या मंडळाची खजिनदार आहे.  चोख हिशेब ठेवते .   

स्वतःच्या व कुटुंबियांच्या आरोग्या बद्दल ती खूप जागरूक असते .   आणि सुनांच्या बाबतीत तर खूपच .  माझ्या स्वतःच्या डॉक्टर मैत्रीणीकडे माझ्या बरोबर येउन तिला काही शंका होत्या त्या तिनी समजावून घेतल्या.  आपली   मुलं शिकली, सुनाही  शिकल्या , किंबहुना मुलापेक्षा ज्यास्त पुढे शिकल्या , ह्याचा तिला सार्थ अभिमान आहे.  आता नातवंड इंग्रजी शाळेत जातात. ती इंग्रजीत बोलली कि कुसुम्चा चेहरा फुलतो . एक सून नोकरी करते .  मी आणि माझी मुलगी तिच्या नातवंडान्च्या वाढदिवसाना पण तिच्या घरी जाउन आलो.  फ़ोटो काढले .  

आपापले संसार सांभाळत सर्व एकत्र, पण तरी वेगळे वेगळे रहातात. तिची मुलं सर्व नातेवैकांचा आदर करतात .  तिच्या सासरच्या लोकांशी तिचे संबंध इतके उत्कृष्ट आहेत, कि त्यांच्या सर्व कार्यात  तिच्या शिवाय अडतं . आजूबाजूला रहाणार्या लोकात अनेक वाईट सवयीची , दारू पिणारी, जेलची हवा खाउन आलेली लोकं  आहेत,  कानावर शब्द पडू नयेत असे शब्द वापरणारी लोकं आहेत, पण हिच्या मुलांना शिकवणच अशी आहे कि तिच्या समोर अपशब्द ते  कधीही  बोलत नाहीत.  

अप्पाप्सात त्यांचे काहीही म्हणणे असो, जेव्हा जरूर पडते तेव्हा तिच्या मुलांची दृष्ट लागावी अशी एकजूट असते . मध्यंतरी एकाला अचानक एका संध्याकाळी ताप येउन आय.  सी. यु.  मध्ये भरती करावं  लागलं . घर दार धावलं . मुलांनी जंग जंग पछाडून, आपल्या स्वतः कडचं  सर्व पणाला लाउन, तीन चार दिवस , रात्रीचा दिवस करून , पैसे उभे केले , सांगितलेली  औषध आणली , आणि भावाला अक्षरशहा त्या व्याधीतून ओढून बाहेर काढलं  . मोठ्या हॉस्पिटलच्या डॉकटरने ही   त्यांचं खूप कौतुक केलं . 

कुसुमच्या तोंडच पाणी  पळालेलं  तेव्हा पहिल्यांदी बघितलं.  सैरभैर झाली . उपास तपास , नवस,  सुचेल तिथे प्रार्थना , सर्व काही केलं . तिची भावंड मदतीला धावली, म्हातारी आई घरी नातवंड सांभाळायला आली , आणि शेवटी  सर्व सुख्रूप घरी आले. 

आजचे आयुष्य

आज जगात विरंगुळा म्हणून खूप काही लोकं करतात.  आज ती आपल्या मुलीबरोबर घरातील एका भागात रहते. वेळी प्रसंगी  मुले व सुना जवळ पास असतात व येतातच. आता नातवंड पण मोठी होत आहेत.  जे काय  ती व मुलगी मिळवतात, त्यात काट्कसरीचा संसार, आणि नवीन प्रदेश बघून स्वतःला समृद्ध करण्याकडे तिचा कल असतो. 

मध्यंतरी त्यांच्या समाजातर्फे एक कोकणात ट्रिप निघली.  मुंबई ते मुंबई बसने प्रवास, आणि कोकणात भारतरत्न आंबेडकरांच्या व त्यांच्या पत्नीच्या गावाला भेट , काही शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्याना भेट , आणि एक महाबळेश्वरि चक्कर , असं  सगळं  होतं. आपल्या शाळकरी  नातवाला मुंबईच्या बाहेरचं जग, आणि इतिहासातल्या   लोकान्बद्दल कळावं म्हणून ती व तिची मुलगी, मोठ्या नातवाला घेउन ह्या ट्रिप ला जाउन आल्या . 

त्याच्या पुढच्या वर्षी पंधरा दिवस रेल्वे व बस नि , त्यांच्या समाजाने अखलेल्या सामुहिक बुद्ध्गयेच्या ट्रीपलाही जाउन  आल्या , आणि महराष्ट्र बाहेरचं जग बघून आल्या .  समृद्ध झाल्या . 

आज तिचं  आयुष्य तिच्या नात्वानमध्ये गुंतलेलं अहे. त्यांचे अभ्यास, त्यांच्या शाळा , त्यांची ट्युशन .  खडतर आयुष्याशी झगड्ल्या नंतर , आज ती जेव्हा नातवाला गृहपाठ करताना बघते , तेव्हा तिला राहून राहून वाटत कि आपण शाळेत गेलो नाही, कधी शिकलो नाही हि फार मोठी चूक केली .

पण तिच्या नातवा  बरोबर बसून, ती सही करायला शिकली .  अजून बँकेत अंगठाच देते, पण बँकेचे सर्व व्यवहार येतात.  

आज तिला वाटतं  , आपल्या मुली सुनाना , आपल्याला जे करता आलं  नाही अथवा मिळालं नाही ते सर्व मिळावं .  तिला मुली सुनांनी नवीन प्रकारचे कपडे केले कि कौतुक वाटतं , पण त्या मागे त्यावर काय बंधन आपणच घालायचे असते हे सर्व जण  समजून आहेत . त्यामुळे तिला कधी मान खाली घालावी लागली नाही . 

मोठ्या मोठ्या लोकाना कोड्यात टाकणार्या तांत्रिक गोष्टी , ती पट्कन आत्मसात करते.  

माझ्या घरी काही कारणास्तव तीन फोन आहेत, आणि काही अंतर्गत प्रकारचे अहेत. माझ्या गैर उपस्थितीत ती कामाला येते , तेव्हा फोन  केला तर न चुकता बरोबर तो  फोन उचलते.   एकदा माझ्या मोठ्या मुलाबरोबर मी स्कैप वर बोलत होते , तेव्हा कौतुकाने त्याच्याशी हेडफोन घालून त्याच्याशी बोलली.  तिच्यावर मी एक व्हिडीओ फिल्म बनवली होती, तेव्हा तिचे अनुभव शब्दात कैद करण्यासाठी  "ओडासीटी" हि संगणक आज्ञावली वापरली होतॆ. अगदी पाचच मिनिटात तिनी त्याचे मायक्रोफोनचे  ऑन /ऑफ व कमी-ज्यास्त   प्रकार शिकून घेतले.

शेवटचे 

अनेक वर्षापूर्वी  प्रसिद्ध शास्त्रद्न्य, नोबेल पारितोषिक विजेते   कै.  ऐन्स्टैन यांचे एक वाक्य वाचलं होतं .  “The only thing that interferes with my learning is my education.”  म्हण्जे,  "मी जीवनात जे शिकलो,  त्याच्या मध्ये मध्ये कायम "औपचारिक शिक्षण " आडवे  येत रहिले. …"

कुसुम च्या आयुष्यात औपचारिक शिक्षण कधी आलेच नाही.  पण अनुभवाने व आपल्या भोवतालच्या समाजाकडे बघून ती खूप शिकली.  अजूनही शिकत्ये . 

खूप वेळा राहून राहून मनात येतं , कि अती औपचारिक शिक्षण घेउन कधी कधी आपल्या संवेदना बोथट होतात, ज्या खरं तर आयुष्याशी झगडून झगडून धारदार होतात.

कुणास माहित, कोणीतरी प्रौढ शिक्षणाचे वर्ग सुरु करेल, आणि आज पासून दोन तीन वर्षात कुसुम हा लेख वाचताना दिसेल ?  

अशक्य काहीच नाही …  

 
(A print version of this, with a photo will shortly be released,  and presented to Kusum. Friends wishing for a copy may kindly let me know)

2 comments:

  1. लेख फार सुंदर असून खूप काही शिकवून जातो.

    ReplyDelete
    Replies
    1. इतक्या सुंदर अभिप्रायाबद्दल आभार . ह्या पोस्ट च्या आधीची पोस्ट वाचा . कुसुमनि स्वतः मला तिची गोष्ट लिहिण्यास सांगितले . का ते आधीच्या पोस्ट http://kaimhanta.blogspot.in/2015/09/shortly-in-printss-story.html मध्ये आहे .

      Delete